जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील निमगिरी गावात शेती व घराच्या वादातून एका तरुणाने आपल्या भावाच्या पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि. 5) रोजी सायंकाळी घडली. तुषार निंबा साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव असून या घटनेत अरुणा शरद साबळे (वय 38) यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी तुषार व त्याचा भाऊ यांच्यात घर व शेतीच्या वाटणीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होते. याच वादातून तुषार साबळे याने घरासमोरील अंगणात अरुणा साबळे यांच्यावर चाकूने जोरदार हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अरुणा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी तुषार साबळे हा फरार झाला.या प्रकरणी मृत महिलेचे पती शरद साबळे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे व अंमलदार गणेश शिंदे करीत आहेत. दरम्यान, खून करून पळून गेलेला आरोपी तुषार साबळे मंगळवारी सकाळी जुन्नर शहरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रस्त्याने जाताना दिसून आला असून, त्या आधारे पोलीस पथकाने शोधमोहीम तीव्र केली आहे.