आकुर्डी – मध्यमवर्गीय कुटुंबातील भावा-बहिणीने सोबतच सनदी लेखपाल अर्थात सीएची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दत्तवाडी, श्रीकृष्णनगर येथील रहिवासी अनिल सावंत यांचे पुत्र मयूर आणि कन्या मृणाल यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. अनिल सावंत रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले, अनेक अडचणींवर मात करत त्यांच्या भवितव्यासाठी अविरत झटले. वडिलांचे हे कष्ट आणि त्याग मुलांना चांगलेच उमगले होते. त्यामुळे त्यांनीही शिक्षणात मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांचा आधार घेत यशाचे शिखर गाठले. सावंत भावंडांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण श्रीकृष्णनगर परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल सावंत म्हणाले, “आमच्या कुटुंबासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मुलांनी आमचे सर्व कष्ट सार्थ ठरवले. देवाच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या शुभेच्छांनी हे शक्य झाले.” मृणाल आणि मयुर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या आशीर्वादाला, गुरुजनांच्या मार्गदर्शनाला आणि श्री गणेशाच्या कृपेला दिले आहे.