Crime News : शिरूर शहरात भरदिवसा गोळीबार
याबाबत शिरूर पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले यांनी माहिती दिली की, सहा महिन्यांपूर्वी मयत हरीश गंगावणे याचे रेवेन्यू कॉलनी असलेले श्रद्धा हॉटेल अँड बार येथे भांडण झाले होते.

शिरूर : शिरूर शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून ३३ वर्ष बार चालक युवकावर दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पोलिसांना एक जिवंत काडतूस, एक पुंगळी, तर चौकामध्ये एक पुंगळी सापडली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने हल्ल्याची तीव्रता थरकाप उडविणारी आहे.
हरीश ऊर्फ हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३३ रा. कामाठीपुरा,ता. शिरूर), असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांत जगताप याने फिर्याद दिली आहे. रोहित रवींद्र सोनवणे (वय २६ रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आदित्य पवार (दोघे रा.गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले यांनी माहिती दिली की, सहा महिन्यांपूर्वी मयत हरीश गंगावणे याचे रेवेन्यू कॉलनी असलेले श्रद्धा हॉटेल अँड बार येथे भांडण झाले होते. रोहित व अनिकेत यांना गंगावणे यांनी मारहाण केली होती. (दि.१७) रात्री लाटेआळी येथील चौकात हे दोन्ही गट समोरासमोर आले होते. त्यावेळी रोहित सोनवणे याने हरीश गंगावणे याला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने गंगावणे व रोहित, अनिकेत यांची भांडणे झाली. ही भांडणे उपस्थितांनी सोडवली.
रोहित हा हरीश गंगावणे यांच्या मित्राचा भाचा असल्याने आंबेडकर नगर येथे सुशांत कांबळे यांना सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान भेटले. त्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर हरीश गंगावणे व त्यांचा मित्र जगताप हे त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले. पाठीमागच्या बाजूला दबा धरून बसलेले रोहित सोनवणे व अनिकेत गव्हाणे दोघांच्या हातात पिस्तूल होत्या. रोहित याने पाठीमागून येऊन दुचाकीवर बसलेले हरीश गंगावणे यांच्या डोक्यावर जवळून गोळी मारली. यात गंगावणे जागेवर खाली पडला. दोन्ही आरोपी पळाले. पुढे त्यांचा मित्र आदित्य पवार हा स्कुटी घेऊन थांबला होता. त्या स्कुटीवर बसून ते पळून जाताना घटनास्थळावरून काही अंतरावर लाटेआळी चौकात बेग यांच्या घरासमोर त्यांनी आणखी हवेत गोळीबार करीत आरडाओरडा केला.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमने पाहणी केली. पोलिसांनी दोन पुंगळ्या व एक जिवंत काडतूस जप्त केल्या असून, आरोपींच्या शोधासाठी चार पथके पाठवले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी सांगितले. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





