ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी श्री स्वामीनारायण मंदिराला दिली भेट; म्हणाले “धर्माने नेहमीच…”

Rishi Sunak In Swaminarayan Mandir| ब्रिटनमध्ये लवकरच संसदीय निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाने पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. यावेळी ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्याबरोबर होत्या.
ऋषी सुनक अनेकदा हिंदू मंदिरांना भेट देतात. याशिवाय ते हिंदू धर्मातील तत्त्वांचे देखील पालन करतात. यातच आता त्यांनी श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी ऋषी सुनक प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “मी एक हिंदू आहे आणि तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या विश्वासातून प्रेरणा आणि दिलासा मिळतो. मला धर्माने नेहमीच मार्गदर्शन केले आहे भगवद्गीतेवर संसद सदस्य म्हणून शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे. आपला विश्वास आपल्याला आपले कर्तव्य करण्यास शिकवते आणि जोपर्यंत कोणी ते निष्ठेने करतं तोपर्यंत परिणामाबद्दल घाबरू नये”, असंही ते पुढे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “एखाद्याने कोणत्याही परिणामांची चिंता करू नये. फक्त प्रामाणिकपणे काम पूर्ण करायचे. माझ्या पालकांनी मला हेच शिकवले आणि मी माझे आयुष्य असेच जगतो. हेच मला माझ्या मुली मोठ्या झाल्यावर त्यांना द्यायचे आहे. हाच धर्म माझ्या आवडीला आकार देतो, जे मला सार्वजनिक सेवेसाठी मार्गदर्शन करते आणि मला माझ्या दृष्टिकोनात मार्गदर्शन करतो.”
ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ६५० जागा आहेत आणि यातील मोजक्याच ठिकाणी रिफॉर्मला विजय मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणांत आणि चाचण्यांमध्ये सुनक यांचा पक्ष पिछाडीवर असून लेबर पार्टीला जास्त जागा मिळत तो पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
पुढील आठवड्यात 4 जुलै रोजी ब्रिटनमध्ये निवडणुका होणार आहेत. यावेळी 14 वर्षांचा कंझर्वेटिव्ह राजवट संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष लेबर पार्टीपेक्षा 20 गुणांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे देशाचे पहिले हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या पदावर कायम राहतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



