पिंपरी – एका खासगी गृहप्रकल्पाच्या बांधकाम साइटवर खोदकाम करताना ब्रिटीशकालीन बॉम्ब सापडला आहे. पोलिसांनी बॉम्ब ताब्यात घेतला असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ही घटना पुनावळे येथे शनिवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे गृहप्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात असताना ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळून आला. त्यावेळी जेसीबी चालक व कामगारांनी तेथील सुपरवायजरला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविण्यात आले. हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब ताब्यात घेतला. तसेच याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती देण्यात आली आहे. या पथकाकडे बॉम्ब देण्यात येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.