Britain PM: ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक आहेत प्रचंड श्रीमंत; ‘इतकी’ आहे संपत्ती

लंडन – भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे. त्यांच्याबाबतच्या सर्व गोष्टींच्या माध्यमांकडून बातम्या केल्या जाऊ लागल्या आहेत. यामध्ये ऋषी सुनक यांच्या मालमत्तेचीही चर्चा व्हायला लागली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात आहेत.
सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची मालमत्ता मिळून एकूण मालमत्ता 730 दशलक्ष पौंड इतकी आहे. यंदाच्या “संडे टाईम्स’ ने प्रसिद्ध केलेल्या 250 जणांच्या अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये सुनक आणि मूर्ती दाम्पत्याला 222 वा क्रमांकावरील स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये समावेश होणारे ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिलेच आघाडीचे राजकीय व्यक्ती ठरले आहेत.
Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे पंतप्रधान, शुभेच्छांचा वर्षाव https://t.co/3CC5UO9dHO
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 24, 2022
ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची मालमत्ता एकेकाळी ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यापेक्षाही जास्त असल्याचे मानण्यात येत होते. इन्फोसिस कंपनीतील समभागांचे मूल्य लक्षात घेतले तर अक्षता मूर्ती यांची एकटीची मालमत्ता 1.2 अब्ज डॉलर पेक्षा कमी नसल्याचा अंदाज आहे. अतिश्रीमंत वर्गामध्ये गणले जात असल्यामुळेच ऋषी सुनक यांना सर्वसामान्य लोकांच्या वेदना आणि संघर्ष समजत नाही, अशी त्यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

