लंडन – रशिया आणि चीन यांच्यासोबत तणाव वाढत चालला असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या अण्वस्त्रांत करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला असल्याची बातमी आहे. त्या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन लवकरच याबाबतची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीस वर्षांपासून ब्रिटन आपल्या संहारक शस्त्रांचे भांडार कमी करण्यासाठी एक प्रक्रिया राबवत होता. मात्र आता बदलत्या वातावरणात ती प्रक्रिया थांबवली जाणार असून उलट अण्वस्त्रांच्या या भांडारात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. त्यांच्याकडे सध्या 180 अणुबॉम्ब असून ती संख्या आता 260 वर नेली जाणार आहे.
गार्डीयनने दिलेल्या बातमीनुसार त्यांना ब्रिटनच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण विषयक एक गोपनीय अहवाल प्राप्त झाला आहे. रशिया आणि चीन या देशांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तो देश आता धोरण बदलत असून आता दहा अब्ज पाउंडची शस्त्र खरेदी करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. या दोन देशांसोबत वाढत असलेला तणाव हेच शस्त्र खरेदी आणि अणुबॉम्बची संख्या वाढवण्यामागचे कारण असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे.
येत्या 2030 पर्यंत दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूपही बदलले असणार आहे. ते आता बायोलॉजिकल, रेडीयॉलॉजिकल आणि केमिकल शस्त्रांचा वापर करू शकतात. त्यामुळे हल्ल्यांच्या या बदलत्या स्वरूपाला तोंड देण्याचीही तयारी असणे आवश्यक असल्याची गरज या गोपनीय अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जग अण्वस्त्रांपासून मुक्त झाले असले पाहिजे असे मानणारा एक मोठा गट जगात आहे. त्यांना ब्रिटनचा हा निर्णय रूचण्यासारखा नाही. जग आज करोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करत असताना ब्रिटनने बॉम्बची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे जगात पुन्हा एकदा अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू होईल असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आपल्या हवाईदलाच्या ताफ्यातही मोठ्या प्रमाणावर घातक लढाऊ विमाने दाखल करण्याचाही ब्रिटनने विचार केला असल्याचे वृत्त आहे.