Operation Safed Sagar : ‘शक्य झालं तर देवआनंद यांना सोबत आणा’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मागणी, 1999 मधील ‘ती’ घटना पुन्हा चर्चेत
Operation Safed Sagar : या सीरिजमध्ये नवाझ यांचे पात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार देवआनंद यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीचा प्रसंग सांगताना दिसते.

Operation Safed Sagar : स्वांतत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित करण्यात आलेली ‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेबसिरीजने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. या वेबसिरीजची कथा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधित घटनांच्या आधारावर तयार करण्यात आली आहे.
सध्या या सिरीजमधील ऐतिसाहिक घटनांपैकी एक घटना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ही सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. अभिनेता विनय पाठक याने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये नवाझ यांचे पात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार देवआनंद यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीचा प्रसंग सांगताना दिसते.
नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? नवाझ शरीफ आणि देवआनंद यांची भेट कशी झाली हे जाणून घेऊयात…
दिवंगत अभिनेते देवआनंद हे बॉलिवूडमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. आज जरी ते हयात नसले तरी त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट अजरामर आहेत. क्लासिक चित्रपटांच्या काळात देवआनंद यांचे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही चाहते होते. पाकिस्तानचे तत्कालीन माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे देखील देव आनंद यांचे चाहते होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, १९९९ मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ बसने पाकिस्तानच्या लाहोरला जाण्यापूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांचा फोनवर संवाद झाला होता. यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी विचारले होते की, “तुम्हाला भारतातून काही हवे असल्यास, कृपया मला कळवा म्हणजे मी ते या दौऱ्यावर माझ्यासोबत आणू शकेन.” हे ऐकून शरीफ म्हणाले, “शक्य असल्यास, देव आनंद यांना तुमच्यासोबत आणा.”
नवाझ शरीफ यांच्या या विनंतीनंतर देवआनंद यांना याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यांनी देखील तात्काळ होकार कळवला. ते भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत पाकिस्तान दौऱ्यावर गेले. जिथे त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. आजही देव आनंद आणि नवाझ शरीफ यांची ही भेट ऐतिहासिक मानली जाते.
देवआनंद यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध
देवआनंद हे पाकिस्तानशी संबंध असलेल्या अनेक हिंदी चित्रपट कलाकारांपैकी एक होते. खरंतर फाळणीपूर्वी देव आनंद यांचा जन्म पाकिस्तानमधील गुरदासपूर येथील शकरगढ येथे झाला होता. जे आज पाकिस्तानमधील नरोवालमध्ये येते. शिवाय त्यांनी लोहार येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. फाळणीपूर्वी शिक्षणासाठी ते पाकिस्तानातील आपले घर सोडून भारतात आले आणि बॉलीवूडचे सुपरस्टार बनले.
ऑपरेशन सफेद सागरविषयी…
‘ऑपरेशन सफेद सागर’ (Operation Safed Sagar) ही ७ ऑगस्ट २०२६ रोजी Netflix वर प्रदर्शित झालेली वेबसिरीज आहे. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने (IAF) केलेल्या ऐतिहासिक हवाई मोहिमेवर ही मालिका आधारित आहे. याचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले आहे. सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, दिया मिर्झा आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.






