अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अकोल्याच्या (Akola) पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठी कारवाई करत एका महिला पोलीस क्लर्कला ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ममता पाटील असे लाचखोर महिला पोलीस क्लर्कचे नाव आहे. अमरावती एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ‘तक्रार फाईल’ पास करण्यासाठी ममता पाटील यांनी तक्रारदाराकडे ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने थेट अमरावती एसीबी कार्यालयात धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे सिद्ध झाले. यानंतर, गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातच सापळा रचण्यात आला. ममता पाटील यांना लाच स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान ममता पाटील यांच्यासोबत त्यांचा नातूही उपस्थित होता. नातवासमोरच आजीला अटक होत असताना ममता पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक कार्यालयातच झालेल्या या कारवाईमुळे काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांवरच झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. एसीबीने ममता पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.