Brett Lee Preity Zinta : १५ वर्षांनी ब्रेट लीने तोडले मौन! प्रीती झिंटासोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर दिलं स्पष्ट उत्तर
Brett Lee Preity Zinta प्रीती झिंटाने २०१६ मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केला. २०२१ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांना जुळी मुले झाली.

Brett Lee Preity Zinta: माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि बॉलिवूड अभिनेत्री तसेच पंजाब किंग्जची सह-मालकीण प्रीती झिंटा यांच्याबाबत एकेकाळी अनेक चर्चा रंगल्या होत्या. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात दोघे अनेकदा एकत्र दिसत असल्याने त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, तब्बल १५ वर्षांनंतर ब्रेट लीने या चर्चांवर पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली असून, आपण कधीही प्रीती झिंटाला किंवा कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केले नसल्याचे सांगितले आहे.
आयपीएलमध्ये ब्रेट ली ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ (आताचे पंजाब किंग्ज) संघाकडून खेळत होता. त्या वेळी संघाची सह-मालकीण असलेल्या प्रीती झिंटासोबत त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये झळकत होते. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, या अफवा केवळ अफवाच असल्याचे ब्रेट लीने आता स्पष्ट केले आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट ली म्हणाला, “मी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला कधीही डेट केलेले नाही. प्रीती झिंटा ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. लोक काय बोलतात याची मला फारशी पर्वा नव्हती, कारण मला सत्य माहिती होते. त्यामुळे या अफवांचा माझ्यावर कधीच परिणाम झाला नाही.”

Preity Zinta Brett Lee Affair Rumours
ब्रेट लीने सांगितले की, सेलिब्रिटींच्या आयुष्यात अशा प्रकारच्या अफवा पसरत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणेच योग्य असल्याचे त्याने म्हटले.
विशेष म्हणजे, २०११ मध्येही ब्रेट लीने एका कार्यक्रमात प्रीती झिंटाबद्दल बोलताना ती भारतातील आपल्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असल्याचे सांगितले होते. “किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आमची चांगली मैत्री झाली. ती भारतातील माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे,” असे तो तेव्हा म्हणाला होता.
दुसरीकडे, या अफवांमुळे प्रीती झिंटाही त्रस्त झाली होती. २०१० मध्ये तिने सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले होते की, तिचे नाव वारंवार संघातील खेळाडूंशी जोडले जात असल्याने ती कंटाळली आहे. “मी सिंगल आहे. मी माझ्या संघातील किंवा कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करत नाही. जेव्हा मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असेन, तेव्हा मी स्वतः सर्वांना सांगीन,” असे तिने स्पष्ट केले होते.
दरम्यान, प्रीती झिंटाने २०१६ मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केला. २०२१ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांना जुळी मुले झाली. आता ती ‘बटवारा १९४७’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचे आहे.
ब्रेट लीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियासाठी त्याने ७६ कसोटी सामन्यांत ३१० विकेट्स, तर २२१ एकदिवसीय सामन्यांत ३८० विकेट्स घेतल्या. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे तो जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
१५ वर्षांनंतर ब्रेट लीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे प्रीती झिंटासोबतच्या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध नसून केवळ घट्ट मैत्री असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.





