Pimpri : मन मोहून घेणारे धबधबे

टाकवे : आकाशातील काळ्याकुट्ट ढगांमधून सतत बरसणाऱ्या सरी आणि त्यामुळे हिरवेगार झालेले डोंगर आणि उंच डोंगरांवरुन शुभ्र, फेसाळणारे धबधबे मावळास स्वर्गासमान भासवत आहेत. निसर्गाच्या सौंदर्याचे हे अनेक रंग पाहताना नागरिक हरखून जात आहेत.
मावळ तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले, ओढे तसेच तलाव व धरणे यांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होत आहे. तर आंदर मावळातील डोंगर रांगावरून मोठमोठे धबधबे प्रवाहित झाले असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसाने मावळ तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून आंदर मावळातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर तर पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे अंदर मावळ भागातील डोंगरी भागात बरोबरच नाणे मावळ विभागातील तसेच पवन मावळ विभागातील पश्चिम पट्ट्यातील डोंगरातून मोठमोठे धबधबे वाहू लागले आहेत.
सर्वाधिक धबधबे हे अंदर मावळ विभागात निर्माण झालेले असून त्या ठिकाणी धबधबे पहाण्यासाठी व आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अंदर मावळ विभागातील माऊ, मोरमारेवाडी, वडेश्वर, कुसवली, कांबरे, दाहुली, कुसुर सावळा, माळेगाव, पुणे अनसुडे,किवळे कशाळ आधी ठिकाणी सर्वाधिक धबधबे डोंगरावरून वाहत आहे. मावळ तालुक्याच्या डोंगराळ भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने तालुक्यातील पवना, वडिवळे, आंध्रा, जाधववाडी, कुजगाव, पुसाणे, मळवंडी धरण यांच्या पाणीसाठ्यामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे. तर तालुक्यातील पवना, इंद्रायणी, आंध्रा, कुंडलिका, सुधा या नद्यांच्या पाणीसाठ्यातही प्रचंड वाढ झालेली आहे.





