Karisma Kapoor: कपूर घराण्याची परंपरा मोडून बनली सुपरस्टार! साखरपुडा तुटला, संसार मोडला; तरीही करिश्मा कपूरची जिद्द कायम
Karisma Kapoor २५ जून १९७४ रोजी कपूर कुटुंबात करिश्माचा जन्म झाला. तिचे वडील अभिनेता रणधीर कपूर तर आई अभिनेत्री बबिता आहेत. घरात तिला प्रेमाने ‘लोलो’ या नावाने हाक मारली जात असे. करिश्मानंतर सहा वर्षांनी तिची धाकटी बहीण करिना कपूरचा जन्म झाला.

Karisma Kapoor: बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्मा कपूरचा आज ५२ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या करिश्माचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. करिअर, प्रेम, लग्न आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
२५ जून १९७४ रोजी कपूर कुटुंबात करिश्माचा जन्म झाला. तिचे वडील अभिनेता रणधीर कपूर तर आई अभिनेत्री बबिता आहेत. घरात तिला प्रेमाने ‘लोलो’ या नावाने हाक मारली जात असे. करिश्मानंतर सहा वर्षांनी तिची धाकटी बहीण करिना कपूरचा जन्म झाला.
चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे करिश्माला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. ती नेहमी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहायची. मात्र १९८८ मध्ये तिच्या आई-वडिलांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बबिता यांनी दोन्ही मुलींचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थिती कठीण झाल्याने करिश्माने शिक्षणापेक्षा अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
कपूर घराण्यातील महिलांनी चित्रपटांमध्ये काम करू नये, अशी परंपरा होती. मात्र करिश्मा अभिनेत्री होण्याच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या आईनेही तिला पूर्ण पाठिंबा दिला. अखेर १९९१ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी करिश्माने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या चित्रपटातील तिचा ग्लॅमरस लूक आणि स्विमसूटमधील दृश्य त्या काळात चर्चेचा विषय ठरले होते. कपूर कुटुंबातील काही सदस्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली होती. मात्र करिश्माने मागे हटण्याऐवजी आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले.

Karisma Kapoor
सुरुवातीच्या काळात तिला अनेक चित्रपट मिळाले, पण बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. ‘पोलिस ऑफिसर’, ‘सपने साजन के’, ‘जागृती’, ‘दीदार’ आणि ‘निश्चय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले. मात्र १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ या चित्रपटाने तिचे नशीब बदलले. अजय देवगणसोबतच्या या चित्रपटामुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत आली.
त्यानंतर ‘अनाडी’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’, ‘हीरो नंबर १’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘बीवी नंबर १’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी तिला स्टारडम मिळवून दिले. विशेषतः गोविंदासोबतची तिची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली.
करिअरप्रमाणेच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. अजय देवगणसोबत तिचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचे प्रेमसंबंध चर्चेत आले. २००२ मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र अवघ्या काही महिन्यांत हा साखरपुडा मोडला. या घटनेनंतर करिश्माने स्वतःला सावरले, पण चित्रपटांमधील तिची उपस्थिती कमी झाली.
२००३ मध्ये तिने उद्योगपती संजय कपूरशी विवाह केला. या विवाहातून तिला समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात तणाव वाढला आणि अखेर २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्माने संजय कपूरवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोपही केले होते.
२०१२ मध्ये तिने ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही, पण तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर तिने टीव्हीवरील रिअॅलिटी शो आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केले. २०२० मध्ये ‘मेंटलहुड’ या वेब सीरिजमधून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केले.
अनेक संकटे, अपयश आणि वैयक्तिक संघर्षांचा सामना करूनही करिश्मा कपूर आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.





