पुणे – पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा परिसर हादरला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला जबरदस्त अपघात काही क्षणांतच आठ जण जिवंत जळून खाक झाले तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून दरीपुलाकडे येणारा एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. या दरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने ठोकर दिली. कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकली आणि क्षणात जळून खाक झाली. या कारमधील दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लिनर यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते. रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने तब्बल आठ मृतदेह बाहेर काढले. तर २२ जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. “नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.