Satish Bhosle | Laurence Bishnoi gang : बीडमधील भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे एकापाठोपाठ एक कारनामे पुढे येत आहे. बॅटने अमानुष मारहाण तसेच शिकारीत आडवे येणाऱ्या ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण केल्याच्या प्रकरणात फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याभाई तिसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडलेला नाही. वन विभागाने शनिवारी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात अधिकाऱ्यांना हरणांसारख्या वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारे सापळे व इतर सामग्री हाती लागली. यामुळे त्याच्यावर हरणाची शिकार करून मांस खाण्याचे आरोप केले जात आहेत. खोक्या भाईने शिरूर तालुक्यातील वनक्षेत्र परिसरात 200 हून अधिक वन्यप्राण्यांची शिकार केली आहे. त्यात हरणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्याच्या घराची झाडाडडती घेतल्यानंतर जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य फासे वगेरे सापडले आहेत. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं. या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई आता लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर असल्याचं दिसत आहे.