Breaking news : राज्यातील विविध भागांमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडून करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ताज्या घटनांनी पुन्हा एकदा शासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. उपनिबंधक सहकारी संस्था विभागातील अधिकारी जगदीश बारी आणि त्यांचा एजंट देविदास पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदाराकडून तडजोडीनंतर १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने बी. जे. मार्केट परिसरातील जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातही एसीबीने मोठी कारवाई करत वन विभागातील आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सागाच्या झाडांच्या तोडणीसाठी परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक पुनम केदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणात नेमकी किती रक्कम लाच म्हणून मागण्यात आली होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. मात्र आठ कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई झाल्याने वन विभागात आणि स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या सलग घटनांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एसीबीच्या कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.