भोर -शहरातील नागोबा आळी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमी उत्सवावर करोनाचे सावट दिसून आले. शनिवार (दि.25) उत्सवात नागोबा मंदिरासमोर सन्नाटा पसरला होता. पहिल्यांदाच शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल टिळेकर यांनी सांगितले. शहरातील नागराज तरुण मंडळ व (ग्रामस्थ) यांच्या वतीने श्रावण महिन्यात दरवर्षी नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवास जवळपास 180 ते 200 वर्षाची परंपरा आहे. शहरातील रामनवमीनंतर नागोबा आळीतील हा उस्तव महत्त्वाचा मानला जातो. नागोबाची दगडी मूर्ती असलेले ूहे मंदिर आहे. याठिकाणी पूर्वी नागपंचमीच्या दिवशी विविध कार्यक्रम होत होते. परंतु आळीत भव्य मंदिर उभारल्याने येथेच नागपंचमी उत्सवाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे उत्सवाला महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने गर्दी करतात. जत्राच भरली जाते. नागपंचमी उत्सव भोरकरांचे श्रद्धास्थान ठरले आहे. मात्र, करोनाच्या सावटात हा उत्सव खंडित झाला आहे.