झेडपीच्या विकासकामांना करोनाचा जबर फटका
खासदार फंडाचा निधी मिळाला नसल्याचाही दावा
पुणे – करोनामुळे लॉकडाऊन आणि त्यामुळे जवळपास सर्वच विकासकामे थांबली. पण, आता अनलॉकनंतरही जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू होत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. कार्यारंभ आदेश देऊनही 146 कामांपैकी 46 कामे हे अद्याप सुरूच झालेली नाहीत. कामगार मिळत नसल्याने या कामांना “ब्रेक’ लागल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालातून समोर आले आहे.
कामे रखडल्याच्या मुख्य कारणांमध्ये “कामगार मिळत नाहीत,’ “पाझर तलावात पाणी आहे,’ “ओढ्याला पाण्याचा प्रवाह’, “रस्त्यालगतचा पोल शिफ्ट करायाचा आहे’ आणि याशिवाय “थेट ज्याला काम दिले आहे तो ठेकेदारच कामावर वेळेत येत नाही’ अशी कारणे या अहवालात आहेत.
विकासकामांतील 50 टक्के ते 90 टक्के फक्त 22 कामे पूर्ण झाली असून 19 कामे हे 80 टक्के अपूर्ण आहेत. यातील सर्वाधिक 51 कामे ही दक्षिण बांधकाम विभागाची आहेत, तर 14 कामे ही उत्तर बांधकाम विभागाची आहेत. तर, अंगणवाड्यांची 13 कामे आहेत. तर एका प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.
सध्या 53 अपूर्ण कामांच्या ठिकाणी कामगार व यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामध्ये बारामती-11, जुन्नर 3, आंबेगाव 2 आणि मावळ, दौंडमधील प्रत्येकी एका कामाचा समावेश आहे. कामांच्या प्रमुख अडचणींमध्ये खासदार फंडाचा निधी मिळाला नसल्याचे देखील म्हटले आहे.
यापुढे जागा असेल, तरच विकासकामांना मंजुरी
जागेअभावी बऱ्याच योजनांची अंमलबजावणी होत नाहीत. यापुढे जागा उपलब्ध असेल, तरच योजनांना मंजुरी द्यावी. त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा दाखला आवश्यक आहे. अनेक योजनांचा निधी उपलब्ध करूनदेखील तो दहा ते पंधरा वर्षे पडून आहे. या योजना आता पूर्ण करण्याच्या असतील तर दुप्पट खर्च होणार आहे. यापुढे या योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत दरमहा योजनांचा घेण्यात येईल, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.