मुष्टियुद्ध ही पुरुषांची मक्तेदारी नाही – मेरी कोम

नवी दिल्ली – मुष्टियुद्धाच्या खेळात महिलादेखील आपला दबदबा निर्माण करत आहेत. हा खेळ केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही, अशा शब्दांत भारताची अव्वल मुष्टियुद्धपटू मेरी कोमने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर एका ऑनलाइन चॅट शोदरम्यान मेरी कोमने देशातील जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपली मते मांडली.
2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझपदक विजेत्या मेरीने आपल्या अनुभवांची शिदोरीच या विद्यार्थ्यांसमोर खुली केली. जागतिक पातळीवर महिला खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. येत्या काळात भारतात महिला पदक विजेत्या खेळाडू तयार झाल्या तरच ही परिस्थिती बदलेल, असा विश्वासही मेरीने व्यक्त केला.
मला देशाकडून या खेळात प्राविण्य मिळविण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले; परंतु या खेळाकडे आकर्षित होत असलेल्या महिला खेळाडूंना अनेक अडचणींचा आजही सामना करावा लागतो. मुळातच घरातूनच पाठिंबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा आपल्या कुटुंबीयांनी आपली इच्छा ओळखली तर मग समाजाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. मी जेव्हा मुष्टियुद्धाचे घडे गिरवायला सुरुवात केली तेव्हा मलादेखील अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यावेळी माझ्या घरचे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. असेच वातावरण जर प्रत्येक मुलीला मिळाले तर येत्या दहा वर्षांच्या काळात अनेक महिला मुष्टियुद्ध खेळाडू तयार होतील, असे मतही तिने व्यक्त केले.
जवळपास एक तास चाललेल्या या संवादात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मेरीला अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तरही मेरीने दिले.





