Box office collection: ‘परम सुंदरी’ची धमाकेदार सुरुवात, ‘वॉर 2’ आणि ‘कुली’ची कमाई घसरली; जाणून घ्या इतर चित्रपटांची स्थिती

Box office collection: प्रेक्षकांसाठी सध्या सिनेमागृहांत अॅक्शन, कॉमेडी आणि रोमॅन्स अशा सगळ्या प्रकारच्या चित्रपटांची रेलचेल आहे. २९ ऑगस्टला रिलीज झालेल्या जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. मात्र, ‘वॉर 2’ आणि ‘कुली’ या चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये घट दिसून आली आहे. तर एनिमेशन फिल्म ‘महावतार नरसिम्हा’ अजूनही स्थिर गतीने कमाई करत आहे.
परम सुंदरी
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत हा चित्रपट शुक्रवारी (२९ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, विकेंडला अजून वाढ होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचा बजेट सुमारे ४० ते ५० कोटी रुपये असल्याचं समजतं.
कुली
रजनीकांतचा ‘कुली’ चित्रपट सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पण आता कमाईत घट होताना दिसतेय. शुक्रवारी या चित्रपटाने १.७५ कोटी रुपये, तर गुरुवारी २.४ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत १६ दिवसांत ‘कुली’ चा एकूण कलेक्शन २७३.२५ कोटी रुपये इतका झाला आहे. मेकर्सना विकेंडला पुन्हा थोडी वाढ होईल, अशी आशा आहे.
वॉर 2
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत ‘वॉर 2’ पहिल्या दिवशी तब्बल ५२ कोटी रुपयांनी सुरुवात करूनही आता संघर्ष करताना दिसतोय. शुक्रवारी या चित्रपटाने फक्त ६५ लाख रुपये, तर त्याआधीच्या दिवशी १.५ कोटी रुपये इतकीच कमाई केली. १६ दिवसांत या चित्रपटाने एकूण २३१.९० कोटी रुपये कमावले आहेत.
महावतार नरसिम्हा
अश्विन कुमार दिग्दर्शित हा अॅनिमेशन चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. रिलीज होऊन ३६ दिवस उलटून गेले तरी शुक्रवारी याने जवळपास १ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत भारतात या चित्रपटाने एकूण २३९.३५ कोटी रुपये कमावले आहेत.





