Box office collection: ‘जॉली एलएलबी 3’ची धमाकेदार सुरुवात; ‘अजेय’ आणि ‘निशानची’चा बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद

Box office collection: शुक्रवारी (१९ सप्टेंबर) बॉलीवूड आणि साउथच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत बॉक्स ऑफिसवर आपले नशीब आजमावले. मात्र या पैकी ‘जॉली एलएलबी 3’ ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करत आघाडी घेतली, तर ‘अजेय’ आणि ‘निशानची’ या चित्रपटांनी फारसा प्रभाव टाकला नाही.
जॉली एलएलबी 3
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी 3’ हा कोर्टरूम ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल १२ कोटी रुपयांची कमाई केली. या मालिकेतील ही तिसरी फिल्म असून यात सौरभ शुक्ला, हुमा कुरैशी, गजराज राव यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे.
निशानची
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’ या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण पहिल्या दिवसाचा आकडा निराशाजनक ठरला. या चित्रपटाने केवळ २५ लाख रुपये कमावले. या चित्रपटातून बाळ ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय’ चित्रपटही शुक्रवारी रिलीज झाला. मात्र यालाही प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त २० लाख रुपये कमावले.
मिराय
साउथ अभिनेता तेजा सज्जा याचा ‘मिराय’ हा चित्रपट पहिल्या आठवड्यात जोरदार ठरला होता. पण आता कमाईचा वेग कमी झाला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने २.५० कोटी रुपये कमावले असून आतापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन ६७.६० कोटी रुपये झाले आहे.
डेमन स्लेयर
जपानी अॅनिमे चित्रपट ‘डेमन स्लेयर’ ने सुरुवातीला तुफान धाव घेतली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात कमाई घटली आहे. शुक्रवारी याने १.८५ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत या चित्रपटाने ५५.२५ कोटी रुपये जमा केले आहेत.
लोका: चैप्टर 1
साउथचा ‘लोका: चैप्टर 1’ हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. शुक्रवारी त्याने १.७५ कोटी रुपये कमावले असून, आतापर्यंतचे एकूण कलेक्शन तब्बल १३०.३५ कोटी रुपये इतके झाले आहे.
एकूण पाहता, ‘जॉली एलएलबी 3’ ने बॉलीवूडला दिलासा दिला असला तरी ‘अजेय’ आणि ‘निशानची’ ने निराशा केली. तर साउथचा ‘लोका’ अजूनही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवून आहे.





