खडकवासला -नातेवाइकांकडे लग्नानंतरच्या मांडवपरतनी आणि नामकरण कार्यक्रमानिमित्त गोऱ्हे खुर्द गावात आलेल्या मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्यावर पाय घसरून पाण्यात बुडाल्या. यामध्ये बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. तर जिगरबाज तरुणांच्या प्रसंगावधानाने सात जणींना वाचवण्यात यश आले. खुशी संजय खुर्दे (वय 13, रा. जि. बुलडाणा), शीतल भगवान टिटोरे (वय 17, रा. जि. बुलडाणा) असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. तर कुमुद संजय खुर्दे (वय 7), पायल संजय लहाने (वय 18), राखी सुरेश मांडवे (वय 16), मीना संजय लहाने (वय 30), पल्लवी संजय लहाने (वय 10, सर्व रा. बुलडाणा), पायल संतोष साळवे (वय 18, रा. सुरत, गुजरात) व शीतल अशोक धामणे (वय 16, रा. जळगाव) अशी वाचवलेल्या तरुणी व मुलींची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी संजय नारायण लहाणे हे गोऱ्हे खुर्द गावात ग्रीन थंब संस्थेत वॉचमनचे काम करत खडकवासला धरण तीरावर लावलेल्या झाडांची निगराणी करतात. तिथेच ग्रीन थंब संस्थेने दिलेल्या पत्र्याच्या झोपडीवजा घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या नातेवाईकांचे लग्न समारंभाच्या मांडव परातनीच्या कार्यक्रमानिमित्त आणि एका नातेवाईकाच्या मुलाच्या बारशानिमित्त जमलेल्या नातेवाईकांपैकी वरील नऊ मुली धरण तीरावर घरात काल रात्री राहावयास आल्या होत्या. आज सकाळी नऊच्या सुमारास सर्व मुली कपडे धुण्यासाठी धरण तीरावर गेल्या असता त्यातील एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. पाणी खोल असल्याने तिला वाचवण्यासाठी बाकीच्या सात जणींनी आरडाओरडा करत तिला धरण्याचाही प्रयत्न केला असता त्याही पाण्यात गेल्या. आरडाओरडा झाल्याने याच वेळी जवळच असलेल्या स्मशानभूमीत सावडण्याचा कार्यक्रमासाठी गोऱ्हे खुर्द आणि झाळणवाडी गावचे ग्रामस्थ जमले होते. यापैकी जिगरबाज संजय सीताराम माताळे आणि रमेश नामदेव भामे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सात मुलींना पाण्यातून वर काढले; परंतु दोघींचा शोध लागला नाही. गोऱ्हे खुर्द गावचे पोलीस पाटील कालीदास तुकाराम माताळे, माजी सरपंच राजेंद्र जोरी, सचिन काळोखे, शिवाजी माताळे यांनी मुलींवर प्रथमोपचार करून त्वरित सातही तरुणींना आपल्या चारचाकी गाडीतून जवळच्या खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. घटनेची माहिती कळताच हवेली पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवलदार विलास प्रधान, दिनेश कोळेकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याचा बंदोबस्त सोडून घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अग्निशामन दलाचे प्रमुख सुजित पाटील जवानांसह आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोन मुलींचा शोध घेतला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे नितीन नम यांनी सांगितले. आम्ही सर्व नातेवाईक पोट भरण्यासाठी खानापूर, गोऱ्हे खुर्द परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलवर आणि फार्महाऊसमध्ये मजुरीचे काम करत आहे. एका नातेवाइकाचे घरी लग्नकार्य आणि बारसे असल्याने गावावरून नातेवाईक आले होते. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे सर्व मुलेही कार्यक्रमासाठी आली आहेत. रात्री माताळवाडी येथील घरी कार्यक्रम झाल्यावर गोऱ्हे खुर्द येथील घरी मुलींसह आलो. सकाळी नऊ जणी कपडे धुण्यासाठी धरण तीरावर गेल्यावर लगेचच ही घटना घडली. -बेबी गजानन गुळवे, माताळवाडी