ब्रुकलिन : मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीतील एका प्राध्यापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. बोस्टन जवळ घरात घुसून ही हत्या करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुनो एफजी लॉरेएरो असे हत्या करण्यात आलेल्या ४७ वर्षीय प्राध्यापकाचे नाव असून ते भौतिकशास्त्र, आण्विक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. सोमवारी रात्री ब्रुकलिन येथील त्यांच्या घरातच त्यांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. मंगळवारी स्थानिक रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे नॉरफ्लॉक डिस्ट्रीक्ट ऍटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. या प्रकरणी मंगळवार दुपारपर्यंत कोणाही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉरेएरो मूळचे पोर्तुगालचे होते. जिथे त्यांनी पदवीपूर्व शिक्षण घेतले होते, त्यानंतर लंडनमध्ये लिस्बन येथे आण्विक फ्युजन विषयात डॉक्टरेट प्राप्त केली होती. लॉरेएरो हे २०१६ मध्ये एमआयटीमध्ये रुजू झाले होते. एमआयटीच्या प्लाज्मा सायन्स आणि फ्युजन सेंटरचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले होते. या सेंटरच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा तंत्रज्ञान विषयक काम करण्याची त्यांची अपेक्षा होती. एमआयटीतील सर्वात मोठी प्रयोगशाळा असलेल्या या केंद्राच्या ७ इमारतींमध्ये २५० पेक्षा जास्त लोक काम करत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.