सीमेवरील तणाव मोदी सरकारच्या गैरव्यवस्थेचा परिणाम- सोनिया गांधी

नवी दिल्ली: कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) मिटिंग आज दिल्लीत झाली. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चीनच्या मुद्यावर सरकारवर निशाणा साधला. सीमेवर चीनबरोबर सुरु असलेला तणाव हा भाजप सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापन आणि चुकीच्या धोरणांचे परिणाम असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.
पेट्रोल आणि डिझेलचे दर आणि कोरोना वाढीबाबत सोनिया यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ‘जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने घसरत असताना, सरकारने सलग १७ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत निर्दयीपणे वाढ केली आहे. आधीच जनता संकटात पण सरकारने त्यांना आणखी संकटात ढकलले आहे. याचा परिणाम असा झाला की भारताची ढासळणारी अर्थव्यवस्था ४२ वर्षात प्रथमच मंदीच्या दिशेने वेगाने घसरत आहे.
कोविड -१९ च्या संदर्भातही सोनिया यांनी सरकारवर टीका केली. देशातील वाढते कोरोना संकट हे नरेंद्र मोदी सरकारचे चुकीचे व्यवस्थाप सर्वात भयंकर अपयशात गणले जाईल. कॉंग्रेसने लॉकडाउन १.० चे समर्थन केले आणि सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शविला पण सुरुवातीच्या आठवड्यात हे स्पष्ट झाले की लॉकडाऊनमुळे होणाऱ्या अडचणी व्यवस्थापित करण्यास सरकार तयार नाही. या काळात देशात १३ कोटीहून अधिक रोजगार गमावल्याचा अंदाज आहे, असा दावा त्यांनी केला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलग दुसर्या दिवशी चीन तणावावर विधान केले. ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर ठामपणे निर्णय न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. यापूर्वी सोमवारी पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर विचारपूर्वक विधान करावे, असा सल्ला मनमोहन सिंह यांनी मोदींना दिला होता.





