Border-Gavaskar Trophy 2024/25 :- दुखापतीतून सावरल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत बंगाल संघाकडून चांगली कामगिरी करत आहे. सध्याच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारताची अवस्था पहाता, बुमराहच्या जोडीला मोहम्मद शमी असल्यास बुमराहवर असलेला दबाव कमी होवू शकेल, असे विधान भारताचा माजी कर्णधार व समालोचक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
ऍडलेड येथे भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी कसोटी पार पडली. टीम इंडियाला ॲडलेडचा किल्ला भेदता आला नाही. पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकली आहे. या कसोटीत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 180 धावा करता आल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 175 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे कांगारूंनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले.
सध्याच्या घडीला बुमराह व सिराज वगळता इतर गोलंदाज हे नवखे आहेत. त्यामुळे बुमराहला गोलंदाजीची धुरा सातत्याने खांद्यावर घ्यावी लागत आहे. त्यामुळे “मोहम्मद शमी जितक्या लवकर येथे पोहोचेल तितके भारतासाठी चांगले होईल,” असे शास्त्री येथे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ‘समालोचन’ करताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, जेव्हा बुमराह गोलंदाजी करत असतो आणि इतर गोलंदाजी करत असतात, तेव्हा तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंवर दडपण पाहू शकता. बुमराहवर खूप दबाव आहे.
घाईने शमीला पाचारण करणे धोक्याचे….
शमी सध्या मुश्ताक अली टी-20 करंडकात 7 लढती खेळला असून लहान स्पेलमध्ये त्याने गोलंदाजीत लय आणि नियंत्रण मिळविले आहे. तिसरी कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन येथील गाबावर होणार आहे. शमीला ब्रिस्बेन कसोटीपेक्षा मेलबर्न आणि सिडनी कसोटीसाठी प्राथमिकता द्यावी, असे शास्त्री म्हणाले. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. त्याने 12 सामन्यात 44 गडी बाद केले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियातील आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याने 31 बळी टिपले आहेत.