सविंदणे -काठापूर (ता. शिरूर) येथील सुमन नथु गोरडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना महिलेचे कपडे व मानवी हाडे आढळून आली आहेत. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. हाडे प्राण्याची की मानवाची याबाबत ऊलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर व वास्तव्य आढळून आहे. पशुधन मारून हे भक्ष्य उसाच्या शेतात नेऊन बिबट्या फस्त करतो. अशा अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. मात्र ही हाडे मानवी आहेत की पाळीव प्राण्याची आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
जर ही हाडे मनुष्याची असली तर या भागातून कोणी मिसिंग आहे का? याचाही तपास आता पोलिसांनी करणे गरजेचे आहे. ज्या उसाच्या शेतात हाडे सापडली, त्याच शेतात महिलेची कपडे आढळल्याने या घटनेला गांभीर्याचे स्वरूप आले आहे.
शिरूर पोलिसांनी पंचनामा करत ही सर्व हाडे ताब्यात घेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवली आहेत. त्यांच्या अहवालानंतरच ही हाडे मनुष्याची आहेत की प्राण्यांची, हे स्पष्ट होणार आहे. तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.