सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : दिल्लीतील शाळांना सलग तिसऱ्या दिवशी बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या. यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
शाळांना असलेल्या धोक्याबाबत एका वाहिनीवर आलेला अलर्ट शेअर करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीतील शाळांना पुन्हा बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या. गृहमंत्री अमित शहा किंवा त्यांच्या चार इंजिन असलेल्या सरकारांना दिल्लीतील लोकांची आणि त्यांच्या मुलांची काळजी नाही. भाजप दिल्लीला जंगलराज बनवण्याच्या तयारीत आहे.
बुधवारी द्वारका येथील सेंट थॉमस स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर, अग्निशमन विभागाला सकाळी ५:२६ वाजता याची माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, वसंत कुंज येथील वसंत व्हॅली स्कूलला सकाळी ६.३० वाजता, हौज खास येथील मदर इंटरनॅशनलला सकाळी ८.१२ वाजता आणि पश्चिम विहार येथील रिचमंड ग्लोबल स्कूलला सकाळी ८.११ वाजता धमकीचा ईमेल मिळाला.
लोधी इस्टेटमधील सरदार पटेल विद्यालयालाही धमकीचा ईमेल मिळाला. अधिकाऱ्याने सांगितले की, या शाळांची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. गेल्या तीन दिवसांत दिल्लीतील नऊ शाळांना बॉम्ब हल्ल्याच्या धमकीचे एकूण १० ईमेल मिळाले आहेत.





