Mumbai Crime | गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावी सेवा केल्यानंतर आज गणरायाला निरोप दिला जात आहे. मात्र याचदरम्यान, मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी एका व्यक्तीने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असून, तो मूळचा बिहारचा आहे आणि नोएडाच्या सेक्टर-११३ भागात गेल्या पाच वर्षांपासून राहत होता. नोएडा पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन देखील जप्त केला आहे. नेमकी काय होती धमकी? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विनीने व्हॉट्सॲप संदेशाद्वारे मुंबई पोलिसांना धमकी दिली होती. ‘लष्कर-ए-जिहादी’ या दहशतवादी संघटनेचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले असून, ते ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स वापरून मोठा स्फोट घडवणार आहेत. या स्फोटात एक कोटी लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याचे त्याने या संदेशात म्हटले होते. Mumbai Crime | मुंबई पोलिसांकडून माहिती मिळताच नोएडा पोलिसांचे सीपी लक्ष्मी सिंह यांच्या निर्देशानुसार पोलीस आणि SWAT टीमने तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाइल फोनही जप्त केला आहे. मुंबई पोलीस आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करत आहेत. हा आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे की तो एखाद्या मोठ्या षड्यंत्रात सामील आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. हेही वाचा: दिव्य तुझे रुप! हैदराबादच्या महागणतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात; भक्तांची अलोट गर्दी