Boman Irani Birthday: बॉलिवूडचे दमदार अभिनेते बोमन इराणी आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. करिअर लवकर सुरू केलं तरच यश मिळतं हा समज बोमन इराणींनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे. त्यांनी 44 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आज ते हिंदी सिनेमातील सर्वात भक्कम अभिनेत्यांपैकी एक आहेत. मुन्नाभाई MBBS पासून 3 इडियट्सपर्यंत त्यांच्या साकारलेल्या भूमिका प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. शॉर्ट फिल्मने दिल वळण करिअरच्या सुरुवातीला बोमन चित्रपटांपासून दूरच होते. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळा मार्ग तयार करून ठेवला होता. 42 वर्षांचे असताना त्यांना एका शॉर्ट फिल्मचे काम मिळाले. मन नसतानाही त्यांनी होकार दिला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी ती शॉर्ट फिल्म पाहिली आणि प्रभावित होऊन बोमनना तात्काळ मुन्नाभाई MBBS ऑफर केली. पहिल्या चित्रपटानेच बदलले आयुष्य मुन्नाभाई MBBS ची शूटिंग फक्त 14 दिवसांची होती. पण या 14 दिवसांनी बोमन इराणींचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. डॉक्टर अस्थाना यांच्या भूमिकेने त्यांना रातोरात लोकप्रियता मिळाली. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी बोमनचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. वडील नसल्याने कुटुंबाचा भार आईवर होता. आई आजारी पडल्यावर बोमनना त्यांच्या बेकरीची जबाबदारी घ्यावी लागली. ते 12 वर्षे बेकरी चालवत होते, ज्यात खास करून आलू चिप्स बनवले जात. वेटरपासून फोटोग्राफरपर्यंत… बेकरीच्या आधी बोमन मुंबईतील ताज हॉटेलमध्ये वेटर, रूम सर्विस स्टाफ आणि बारटेंडर म्हणूनही काम करत होते. कुटुंबाची इच्छा होती की ते डॉक्टर किंवा वकील बनावेत, पण बोमनांना लवकरच कामाला जावे लागले. चित्रपटातील करिअर उशिरा सुरू झाले असले तरी त्यांनी साकारलेला प्रत्येक रोल इतक्या ताकदीने निभावला की ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहिले. वास्तविक आयुष्यात बोमन विचारसरणी, स्वातंत्र्य आणि स्वप्नांना महत्त्व देतात. 3 इडियट्समधील “वायरस” या त्यांच्या भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचविले.