Neha Pendse: लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या ‘तिघी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात भारती आचरेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्याचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या नेहा पेंडसेने आता निर्माती म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली आहे. ‘तिघी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती अनेक मुलाखती देताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीत तिने आई होण्याबद्दल आणि बीजांड गोठवण्याबद्दल (एग्ज फ्रीझिंग) मनमोकळेपणाने मत व्यक्त केलं. नेहा पेंडसे सांगितलं की ती लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे आयुष्यात जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण खूप लवकर आला. “मी खूप लहानपणापासून काम करत असल्यामुळे माझ्यावर नेहमीच जबाबदारीची भावना होती. सतत काम करत असल्यामुळे मला स्वतःसाठी जगण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे लग्न होईपर्यंत मला मूल नकोय यावर मी ठाम होते,” असं ती म्हणाली. ती पुढे म्हणाली की, लग्नानंतर लगेचच कोरोना महामारीचा काळ सुरू झाला. त्या काळात जवळपास दोन वर्षे सगळ्यांचं आयुष्य थांबल्यासारखं झालं. “त्या काळात मला स्वतःबरोबर बसून खूप विचार करण्याची संधी मिळाली. माझ्या करिअरमध्ये प्रगती झाली होती, पण वैयक्तिक आयुष्यात मी स्वतःला किती ओळखते, याचा विचार करण्याची वेळ आली,” असं तिने सांगितलं. Neha Pendse नेहाच्या मते, वय वाढत जातं तसं माणसाच्या विचारांमध्ये आणि मूल्यांमध्येही बदल होत असतो. “विशीत आपण वेगळे विचार करतो, पण दरवर्षी अनुभव वाढतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या काळात मला अनेक प्रश्न पडले मी नेमकी कोण आहे? मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे?” असं ती म्हणाली. याच विचारांच्या काळात तिच्या मनात बीजांड गोठवण्याचा विचार आला. मात्र त्या वेळीही ती आई व्हायचं आहे की नाही, याबाबत ठाम नव्हती. नेहा म्हणाली, “मला असं वाटतं की जर मी आई झाले तर माझं संपूर्ण आयुष्य मुलाभोवतीच फिरू लागेल. कारण माझी आईही तशीच आहे. मी लहान असताना माझ्या आईने मला खूप संरक्षण दिलं आणि माझ्यासाठी खूप काही केलं.” याच अनुभवामुळे तिच्या मनात आई होण्याबद्दल दडपणही निर्माण होत असल्याचं तिने सांगितलं. “मी अशी नाही की आईही होईन आणि त्याचवेळी करिअरही सांभाळेन. माझ्यात तेवढी चिकाटी आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मला स्वतःलाच विचारावं लागलं की मला खरोखर ही जबाबदारी घ्यायची आहे का,” असं नेहा म्हणाली. शेवटी तिने भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन बीजांड गोठवण्याचा निर्णय घेतला. “जर कधीतरी मला आई व्हाव वाटलं आणि जैविकदृष्ट्या ते शक्य नसेल, असं होऊ नये म्हणून मी बीजांड गोठवून ठेवले. पण आजही माझं मत तसंच आहे की मला आई व्हायचं आहे की नाही, याबद्दल मी अजूनही ठाम नाही,” असं नेहा पेंडसेने स्पष्ट केलं.