Celebs Who Turned Down Padma Awards: जाणून घ्या पद्म पुरस्कार नाकारणारे दिग्गज; ज्यांनी सन्मानापेक्षा स्वाभिमानाला दिले महत्त्व!
Celebs Who Turned Down Padma Awards भारतीय चित्रपटसृष्टी, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणांमुळे पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.

Celebs Who Turned Down Padma Awards: भारतातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे पद्म पुरस्कार मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी मोठे यश मानले जाते. मात्र, काही दिग्गज कलाकारांनी हा सन्मान नाकारत स्वतःची ठाम भूमिका मांडली होती. भारतीय चित्रपटसृष्टी, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणांमुळे पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.
प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांचे नाव या यादीत विशेष चर्चेत राहिले. ‘एंग्री यंग मॅन’ची प्रतिमा हिंदी सिनेमाला देणाऱ्या सलीम खान यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र त्यांनी हा सन्मान स्वीकारला नाही. त्यांनी याबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती, पण त्यांच्या कामाच्या मानाने हा पुरस्कार कमी असल्याची चर्चा इंडस्ट्रीत झाली होती.
दक्षिण भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका एस. जानकी यांनीही पद्म पुरस्कार नाकारला होता. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये हजारो गाणी गाणाऱ्या जानकी यांना २०१३ मध्ये पद्मभूषण जाहीर झाला होता. मात्र त्यांनी हा सन्मान खूप उशिरा दिला जात असल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच दक्षिण भारतातील कलाकारांना राष्ट्रीय पातळीवर योग्य सन्मान मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंह यांनी मात्र वेगळ्या कारणामुळे पुरस्कार परत केला होता. त्यांना १९७४ मध्ये पद्मभूषण मिळाला होता. पण १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या निषेधार्थ त्यांनी हा सन्मान सरकारला परत केला. समाज आणि राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती.
बंगाली संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका संध्या मुखोपाध्याय यांनीही पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. २०२२ मध्ये त्यांना हा सन्मान जाहीर झाला होता. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, इतक्या मोठ्या आणि ऐतिहासिक कारकिर्दीनंतर पद्मश्री हा त्यांच्या कर्तृत्वाच्या तुलनेत लहान सन्मान आहे. त्यामुळे त्यांनी तो स्वीकारला नाही.
सतारवादनाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे उस्ताद विलायत खान यांनी तर तब्बल तीन वेळा पद्म पुरस्कार नाकारले होते. १९६४ मध्ये पद्मश्री, १९६८ मध्ये पद्मभूषण आणि २००० मध्ये पद्मविभूषण जाहीर झाला होता. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या मते, कलेचा खरा सन्मान पुरस्कारांपेक्षा मोठा असतो.
या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे काही कलाकारांसाठी सन्मानापेक्षा स्वाभिमान आणि आपल्या कलेचे योग्य मूल्यमापन अधिक महत्त्वाचे असते.





