भरूच (गुजरात) : गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जीआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत बुधवारी पहाटे झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना भरूचमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार ते पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. भरूच जिल्ह्यातील एका औषध कारखान्यात बुधवारी पहाटे बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. ही दुर्घटना सायखा जीआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यात पहाटे २.३० च्या सुमारास घडली. हा स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे जवळच्या चार कंपन्यांचेही नुकसान झाले. या स्फोटानंतर बहुतेक कामगार बाहेर पडण्यात यशस्वी झाले. परंतु त्यापैकी तीन जण अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. आग विझवल्यानंतर त्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सुमारे २० कामगार जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा पथके घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटानंतर एक व्यक्ती बेपत्ता असून इमारतीत अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळाची कसून तपासणी करत आहेत.