पुणे – बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी, फसवणूक, बेकायदा सावकारी प्रकरणातील फरार आरोपी आणि माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर बुधवारी सकाळी पोलिसांनी छापे टाकले. तेथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये काही कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले आहे.
शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी सहा पोलीस पथकांच्या माध्यमातून ही छापेमारी करण्यात आली. या ठिकाणी सापडलेली संशयास्पद कागदपत्रे, बनावट शिक्के व इतर सामग्रीच्या पंचनाम्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. धनकवडी व लुल्लानगर येथील घरावरदेखील पोलिसांनी छापे टाकले असून, धनकवडी येथील घरातून मोठ्याप्रमाणात संशयास्पद कागदपत्रे हाती लागली आहेत.
जमिनीसंदर्भात ही कागपत्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणीसह वेगवेगळ्या कलमाखाली जुलैमध्ये रवींद्र बऱ्हाटेसह चौघांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून बऱ्हाटे पसार आहे. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत.
रवींद्र बऱ्हाटेच्या घरासह त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर पोलिसांनी छापे मारले. यावेळी धनकवडी येथील घरातून जमिनीसंदर्भात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे हाती लागली आहेत. तसेच काही शिक्के पोलिसांना आढळले आहेत. सहा पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे.
– पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त