पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशभर गाजत असलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची चर्चा देशभर सुरू असतानाच पुणे महापालिकेतही नोकरी मिळविण्यासाठी सात जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याची तक्रार महापालिकेस प्राप्त झाली आहे.
महापालिका प्रशासनाने ही तक्रार गांभीर्याने घेत या प्रकरणांची चौकशी सुरू केली असून, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सोमवारी दिल्या आहेत.
काय आहे प्रकार
महापालिकेत मागील वर्षी, तसेच गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विभागांत भरती करण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याची तक्रार दिव्यांग कल्याण विभागाकडे आली आहे.
या तक्रारीत ही बाब गंभीर असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी तक्रारदाराने दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांनी महापालिकेला पत्र देऊन त्यावर कार्यवाही करावी, असे कळविले होते.
महापालिकेच्या सेवक वर्ग विभागाने या तक्रारींची दखल घेत संबंधित अभियंत्यांच्या चौकशीबाबत आयुक्तांच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे,
तर राज्य शासनाकडेही याबाबत तक्रारी आलेल्या असून, शासनाने त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कठोर कारवाई होणार
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ या अभियंत्यांच्या चौकशीसाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
अतिरिक्त आयुक्तांकडूनही याप्रकरणी तत्काळ प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांची मान्यता मिळताच या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.