Boeing Company : बोईंगची भारतातील उलाढाल वाढणार; भारत बोईंगला सुट्या भागाचा पुरवठा वाढविणार
अमेरिकेतील बोईंग विमान कंपनीची भारतामध्ये नागरी आणि लष्करी 265 विमाने कार्यरत आहेत. त्याचबरोबर भारतातील विमान कंपन्यांनी बोईंगला बर्याच ऑर्डर दिल्या आहेत. अशा परिस्थितीत भारत अमेरिका अंतरीम व्यापार करारानंतर बोईंगचे भारतातील कामकाज वाढणार आहे.

Boeing Company : अमेरिकेतील बोईंग विमान कंपनीची भारतामध्ये नागरी आणि लष्करी 265 विमाने कार्यरत आहेत. त्याचबरोबर भारतातील विमान कंपन्यांनी बोईंगला बर्याच ऑर्डर दिल्या आहेत. अशा परिस्थितीत भारत अमेरिका अंतरीम व्यापार करारानंतर बोईंगचे भारतातील कामकाज वाढणार आहे. त्याचबरोबर भारतातून बोईंगला सुट्या भागाचा पुरवठा वाढणार असल्याचे दिसून येते.
या कराराची घोषणा झाल्यानंतर अधिकार्यांनी सांगितले की, भारतात बोईंगला सुट्या भागाचा पुरवठा करणार्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. आता करारामुळे या कंपन्यांचे कामकाज वाढणार आहे. या कराराची माहिती देताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की बोईंग कंपनी भारतातून सर्वात जास्त विमानाचे सुटे भाग विकत घेणार आहे. यासाठी बोईंग कंपनी भारतात बरीच गुंतवणूक करणार आहे. कारण भारत अमेरिकेकडून बरीच बोईंग विमाने खरेदी करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार बोईंग कंपनीला भारतात 325 कंपन्या सुट्या भागाचा पुरवठा करतात. या कंपन्या अमेरिकेला सध्या 1.25 अब्ज डॉलरच्या सुट्ट्या भागाचा पुरवठा करीत असल्याची माहिती आहे. गोयल यांनी सांगितले की बोईंग कंपनीबरोबरच युरोपातील एअरबस कंपनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. एअरबस कंपनीला भारतातील उद्योग सध्या 1.4 अब्ज डॉलरच्या सुट्या भागाचा पुरवठा करीत आहेत.
2030 पर्यंत भारतातून एअरबस कंपनीला दोन अब्ज डॉलरच्या सुट्या भागाचा पुरवठा करण्यात येईल. अशा परिस्थितीत या क्षेत्रात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग उभारले जातील. यामध्ये उच्च दर्जाचे लाखो रोजगार निर्माण होऊ शकतील असे गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले.





