देहरे शिवारात तरुणाचा आढळला मृतदेह

नगर – नगर- मनमाड महामार्गालगत देहरे (ता.नगर) येथील टोलनाक्याजवळील शेतात एका अंदाजे ३५ वर्ष वयाच्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (दि.२७) सकाळी आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
देहरे टोलनाक्याजवळ दादा दामोधर करंडे यांच्या शेतात हा अनोळखी मृतदेह सकाळी ९ च्या सुमारास आढळून आला. या परिसरात शेती असलेले कचरू गणपत करंडे हे शेतकरी सकाळी त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी जात असताना दादा करंडे यांच्या शेतात सोयाबीनच्या पिकात पडलेला मृतदेह त्यांना दिसून आला. ही माहिती त्यांनी पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार यांना सांगितली. खजिनदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना ही माहिती कळविली.
एमआयडीसीचे स.पो.नि. माणिक चौधरी, उपनिरीक्षक मोंढवे, पोलीस कर्मचारी भास्कर मिसाळ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून मृतदेह मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला असून या वयाचा कोणी तरुण बेपत्ता झाल्याची नोंद नगर जिल्ह्यातील कुठल्या पोलीस ठाण्यात दाखल आहे, का याचा शोध घेत आहे.





