Body Odour: उन्हाळा सुरू झाला की घाम येणं स्वाभाविक आहे, पण अनेकांना घामाच्या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणी लाजिरवाण्या प्रसंगालाही सामोरं जावं लागतं. मात्र ही दुर्गंधी थेट घामामुळे नसते, तर शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे येते. घामाच्या ओलाव्यात बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे वास निर्माण होतो. अनेकजण डिओ किंवा परफ्यूम वापरून हा वास झाकण्याचा प्रयत्न करतात, पण तो कायमचा दूर होत नाही. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पाण्याची कमतरता, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, हार्मोन्समधील बदल आणि चुकीचे कपडे हेही घामाच्या दुर्गंधीमागची कारणं असू शकतात. काही कपडे घाम शोषत नाहीत, त्यामुळे बॅक्टेरिया वाढायला मदत होते. त्यामुळे नैसर्गिक उपायांनी ही समस्या सोडवणं अधिक फायदेशीर ठरतं. सर्वात सोपा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून अंघोळ करणं. यामुळे त्वचेवरील जंतू कमी होतात आणि दुर्गंधी कमी होते. तसेच त्वचेवरील छोटे पुरळ, सूज यावरही याचा फायदा होतो. मात्र त्वचा कोरडी असेल तर हा उपाय करताना काळजी घ्यावी. तुरटी हे देखील एक प्रभावी उपाय आहे. तुरटी मध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात. आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्यास किंवा बगलांवर हलक्या हाताने तुरटी चोळल्यास दुर्गंधी कमी होते. यामुळे त्वचेवरील किरकोळ जखमा आणि दाणेही कमी होतात. Sweating and Body Odor नैसर्गिक फ्रेशनेस मिळवण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडाही उपयोगी ठरतो. आंघोळीनंतर एक मग पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळून शरीरावर ओतल्यास दुर्गंधी कमी होते आणि शरीराला ताजेतवाने सुगंध येतो. याशिवाय निलगिरीचं तेल देखील फायदेशीर आहे. आंघोळीच्या पाण्यात काही थेंब निलगिरी तेल टाकल्यास त्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण त्वचेला संरक्षण देतात. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि दुर्गंधीपासून बचाव होतो. दैनंदिन जीवनात काही सवयी बदलल्यासही घामाची दुर्गंधी टाळता येते. कापूस, लिनन, खादी किंवा रेयॉनसारखे कपडे वापरणं योग्य ठरतं, कारण हे कपडे घाम शोषून घेतात. कपडे स्वच्छ धुणं आणि त्यासाठी लॉन्ड्री सॅनिटायझर वापरणंही महत्त्वाचं आहे. तसेच शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यावश्यक आहे. भरपूर पाणी पिणं, व्हिटॅमिन सीयुक्त फळं आणि भाज्या आहारात समाविष्ट करणं यामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात आणि दुर्गंधी कमी होते. एकूणच, काही साधे आणि नैसर्गिक उपाय अवलंबल्यास घामाच्या दुर्गंधीपासून सहज सुटका मिळू शकते. डिओ किंवा परफ्यूमवर अवलंबून राहण्यापेक्षा हे उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.