Bob Cowper : क्रिकेटमधील पहिले त्रिशतकवीर बाॅब काउपर यांचे निधन

पर्थ : कसोटी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावणारे फलंदाज बॉब काउपर यांचे रविवारी वयाच्या ८४ व्या वर्षी आजाराशी झुंज देत निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी डेल आणि मुली ऑलिव्हिया आणि सारा आहेत. बॉब यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड यांनी शोक व्यक्त केला आणि म्हटले की, बॉब काउपर यांच्या निधनाच्या बातमीने आम्हाला खूप दुःख झाले आहे. एमसीजीवरील त्याचे त्रिशतक नेहमीच लक्षात राहील. बॉब मोठ्या खेळी खेळण्यासाठी ओळखला जात असे. बॉब हा एक अत्यंत प्रतिभावान डावखुरा फलंदाज होता. तो त्याच्या आकर्षक फलंदाजी, संयम आणि मोठ्या खेळी खेळण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जात असे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे १९६६ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंडविरुद्धची त्याची ३०७ धावांची खेळी. कसोटी क्रिकेटमधील हे पहिले त्रिशतक होते आणि या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका कायम ठेवली.
१९६४ ते १९६८ दरम्यान काउपरने २७ कसोटी सामने खेळले आणि ४८.१६ च्या सरासरीने २०६१ धावा केल्या. त्यात पाच शतकांचा समावेश होता. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि व्यवसायाच्या जगात प्रवेश केला. त्याच वेळी, बाॅबने व्हिक्टोरियासाठी ८३ प्रथम श्रेणी सामने खेळले. नंतर त्यांनी आयसीसी मॅच रेफरी म्हणूनही काम पाहिले. २०२३ मध्ये, क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





