मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बेस्ट कामगार सेनेत मोठा फेरबदल करत आमदार सचिन अहिर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अलीकडील बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाने मुंबईतील राजकीय रणनीती बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे बंधूंची युती आणि टीकेचा भडिमार मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संघटनांनी एकत्र येऊन पॅनल उभे केले होते. मात्र, या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही आणि ठाकरे गटाच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सत्ताधारी पक्षांकडून, विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) ठाकरे ब्रँड संपुष्टात आल्याची टीका जोरदारपणे सुरू झाली. या पराभवामुळे ठाकरे गटावर दबाव वाढला होता, आणि त्यातूनच बेस्ट कामगार सेनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट कामगार सेनेत फेरबदल बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील पराभवानंतर बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्याचबरोबर संपूर्ण कार्यकारिणीने सामूहिक राजीनामे सादर करून संघटनेत नव्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आमदार सचिन अहिर यांच्यावर बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. सचिन अहिर यांचा कामगार चळवळीतील दांडगा अनुभव आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. अहिर यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेना नव्या जोमाने आणि आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीची रचना बेस्ट कामगार सेनेच्या नव्या कार्यकारिणीत आणखी काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाचे उपनेते नितीन नांदगावकर यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नांदगावकर हे त्यांच्या आक्रमक आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘खळखट्याक’सह इतर पद्धतींनी आंदोलने केली आहेत. याशिवाय, गौरीशंकर खोत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नेतृत्वामुळे बेस्ट कामगार सेनेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.