काही वर्षांपूर्वी मुंबई शहर शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जायचे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार सहज विजयी होत असत. मात्र, गेल्या १५ वर्षांत मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पालिका निवडणुका चुरशीच्या होऊ लागल्या. मागील काही निवडणुकांत शिवसेनेला सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीत मात्र चित्र अधिक गुंतागुंतीचे आणि अनिश्चित आहे. २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर आज अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह मिळाले आहे. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला. उद्धव गटाला राज्यभरातून फक्त २० आमदार निवडून आणता आले, तर शिंदे गटाने ५७ आमदार निवडून आणले. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीतही भाजपच्या पाठोपाठ शिंदे गटाने जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी ६१ नगराध्यक्ष निवडून आणले. आता महापालिका निवडणुकीतही तोच जोर कायम ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. कालपासून राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या यादी जाहीर केल्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार यादीची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला सहा पैकी चार जागा मिळाल्या आहेत: – १८२ वॉर्ड – मिलिंद तांडेल – १९१ वॉर्ड – प्रिया सरवणकर गुरव – १९२ वॉर्ड – कुणाल वाडेकर – १९४ वॉर्ड – समाधान सरवणकर या भागात शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा थेट सामना रंगणार आहे. प्रिया सरवणकर गुरव आणि समाधान सरवणकर ही दोन्ही माजी आमदार सदा सरवणकर यांची मुले आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रभादेवी मतदारसंघातून सदा सरवणकर यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या दोन्ही मुलांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती असून जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची युती जाहीर झाली असली तरी जागावाटपाचा पेच कायम आहे. या निवडणुकीत शिवसेना फुटीचा मोठा प्रभाव पडणार असून, शिंदे गटाच्या मजबूत कामगिरीमुळे उद्धव गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यंदा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे चित्र काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.