मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराला जोरदार रंग चढलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक ९३ चे शिंदे सेनेचे उमेदवार सुमित वजाळे यांनी गुरुवारी थेट मातोश्रीच्या बाहेर जाऊन प्रचार केला. “ठाकरे कुटुंब आमचे मतदार आहेत, आम्हाला त्यांना भेटायचे आहे आणि आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत,” असे सुमित वजाळे यांनी मातोश्रीबाहेरील सुरक्षारक्षकांना सांगितले. या कृतीमुळे संपूर्ण मुंबईत आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुती (भाजप-शिंदे सेना) समोर ठाकरे गट आणि मनसेच्या आघाडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात निकराची लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत. अशा तीव्र स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मताची किंमत जाणून पक्ष थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपले मुद्दे आक्रमकपणे मांडत आहेत. या प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले सुमित वजाळे हे शिंदे सेनेच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) कडून उमेदवारी लढवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. नंतर शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रभाग क्रमांक ९३ मधून उमेदवारी देण्यात आली. मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचे अधिकृत निवासस्थान असून, हा प्रभाग त्याच परिसरात येतो. वजाळे यांनी मातोश्रीबाहेर प्रचार करताना सुरक्षारक्षकांना सांगितले, “आम्ही प्रचारासाठी आलो आहोत. याच प्रभागातून निवडणूक लढवत आहोत. मतदारांना भेटून आमचे मुद्दे पटवून देण्यासाठी आलो आहोत. ठाकरे कुटुंबातील कोणीही भेटले तरी चालेल.” या कृतीला राजकीय प्रतीकात्मकता आहे, कारण एकनाथ शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील वैर तीव्र आहे. दोन्ही गटांचे नेते सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिंदे सेनेच्या या प्रचार धोरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मातोश्रीबाहेर थेट प्रचार करण्याची ही कृती निवडणुकीतील आक्रमकता आणि धाडस दाखवणारी मानली जात आहे. बीएमसी निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा घटनांमुळे स्पर्धा आणखी रोचक होत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, अशा प्रचार पद्धतींमुळे मतदारांच्या मनात उत्सुकता निर्माण होत असली तरी लढत आणखी कडवी होण्याची शक्यता आहे. कोण आहेत सुमित वजाळे? सुमित वजाळे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ९३ मधून एकनाथ शिंदे यांनी सुमित वजाळे यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी आरपीआयकडून निवडणूक लढवली, दुसऱ्या क्रमाकांची मते त्यांना मिळाली होती. सुमित वजाळे यांच्यासमोर रोहिणी कांबळे यांचे आव्हान आहे. प्रभाग क्रमांक ९३ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचे वजाळे आपले नशीब आजमावत आहेत.