पुणे जिल्हा | बारामतीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार

बारामती, (प्रतिनिधी) – राज्यातील उर्वरित 287 विधानसभा मतदारसंघात आला नसेल एवढा निधी गेल्या पाच वर्षांत बारामतीसाठी केंद्र, राज्यातून आणला आहे.
बारामतीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. अंबांनींकडे असलेले बारामती विमानतळ आता एमआयडीसीकडे आले असून तेथे आता नाईट लॅडींग सुरू केले जाणार आहे.
नीरा-कर्हा जोड प्रकल्प, कॅन्सर हॉस्पिटल, अधिकार्यांसाठी निवासस्थाने, उद्याने अशी अनेक कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, बारामती शिक्षणाचे हब झाले आहे. त्यामुळे अर्थकारणाला गती मिळाली आहे. शहर-तालुक्यात एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. देशातून, राज्यातून विद्यार्थी इथे येत आहेत. विमानतळावर नाईट लॅण्डींग सुविधा सुरू केली जाईल.
त्याद्वारे 24 तास विमाने इथे उतरू शकतील. त्यातून गुंतवणूकदार येतील. कारखानदारी वाढेल, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळेल. एमआयडीसीतील एसटी डेपो तेथून हलवत दुसरीकडे काम सुरू केले आहे.
या जागी आता कॅन्सर हॉस्पिटल बांधले जाईल. बारामतीत मेडिकल कॉलेज, आयुर्वेद कॉलेज सुरू केले आहे. आता कॅन्सर हॉस्पिटलची सुविधा होत आहे. इरिगेशन बंगल्याच्या जागेत अधिकार्यांच्या निवासस्थानासाठी 58 कोटींचा निधी दिला आहे.
या योजना मार्गी लावल्या जाताहेत
जानाई-शिरसाई, पुरंदर उपसा, लाकडी निंबोडी योजनेची कामे मार्गी लावली जात आहेत. सोमेश्वरने 3571 रुपयांचा उच्चांकी दर दिला आहे.
संस्था चांगल्या चालवल्याने हे घडते आहे. सौर उर्जेचे मोठे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. ज्यांच्यासाठी हे करतो, त्यांच्या चेहर्यावर आनंद असला की काम करण्याचे समाधान मिळते. अर्थात त्यासाठी नेतृत्वात काम करण्याची धमक आणि गुण हवेत, असे पवार म्हणाले.





