उकाड्यावर फुंकर… मेघगर्जनेसह जोरदार पावसाने पुणे चिंब
Updated On:

पुणे – शहरातील बहुतांश भागात रविवारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त पुणेकरांवर या अवकाळी पावसामुळे जणू गारव्याची फुंकर मारल्याचे दिसून आले. दरम्यान, पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
शहर आणि परिसरात सकाळपासून उन्हाचा चटका लागत होता. दुपारनंतर मात्र आकाश ढगाळ झाले आणि सायंकाळच्या सुमारास शहरात विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या.
वारजे, धायरी, सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण, धनकवडी अशा उपनगरांसहित संपूर्ण शहराला पावसाने झोडपले.
या पावसामुळे खरेदी अथवा अन्य कामासांठी घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी कोणी रस्त्याकडेला, झाडाखाली, आडोशाला उभे राहिले.





