मुंबई – वाझेंनी केलेला आरोप केला हा आताचा नाही तो आधीचा आहे. त्यांनी याआधीही हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतले होते. त्यांना परत का घेतले? अनिल देशमुख म्हणतात पेन ड्राइव्ह आहे तो एकदा दाखवा. माझ्या केसमध्ये एसपी मुंढे यांनी प्रेशर असल्याचे बोलले आहे. त्यात तथ्य आहे. अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. आता तुमचे बिंग फुटले आहे, असे म्हणज भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी असल्याचा आरोप देशमुखांनी केला. यावर गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वीच राज्यात आरोप – प्रत्यारोपांची राळ उठण्यास सुरुवात झाली आहे. गिरीश महाजन म्हणाले, वाझेनी पत्रात काय लिहिले आहे हे मला नक्की माहीत नाही. पण, त्यात नाव असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. कोणी कोणी काय काय कारनामे केले आहेत? किती पैशांच्या मागण्या केल्या? किती खंडण्या मागितल्या? स्वतःवरील आरोप सिद्ध होत असल्याने त्यांना आता यातना होत आहेत. म्हणून केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करायचे, वाटेल तसे बोलायचे. अनिल देशमुख तुम्ही म्हणता ना की तुमच्याकडे पेन ड्राइव्ह आहे दाखवा ना मग, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांना दिले आहे. आमच्याकडचा पेन ड्राइव्ह आम्ही विधानसभेत दाखवला आहे. खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र यात तेच फसले आहे. आता या प्रकरणी काय करायचे हे यंत्रणा ठरवतील. आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले होते, असा आरोपही महाजनांकडून करण्यात आला आहे. भाजपचे अत्यंत गलिच्छ राजकारण – सुप्रिया सुळे राज्यसह देशात भाजपमुळे राजकारण हे अत्यंत गलिच्छ झाले असून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच अशाप्रकारे या गोष्टी समोर कशा येतात, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. केंद्रात गेली 10 वर्षे त्यांची सत्ता आहे, राज्यात अडीच वर्षे ते सत्तेत आहेत. तरीही आज ही परिस्थिती आहे. ज्या अनिल देशमुखांवर आरोप होत आहेत, त्यांच्यावर न्यायालयात आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मग तरीही आताच या गोष्टी समोर यायचे कारण काय, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही प्रमुख लोक तुरुंगातील गुंडाचा वापर करत आहेत. तुरुंगात फोन जात आहेत. एका आरोपीच्या वक्तव्याला इतके महत्त्व देऊ नका. महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टोळीने खाली आणून ठेवला आहे. त्यांच्याकडे प्रवक्ते नाहीत, म्हणून त्यांनी तुरुंगातील गुंडांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. – खासदार संजय राऊत, ठाकरे गट