प्लाझ्मा थेरपीसाठी चक्क रक्तविक्री!

डार्कनेटवरील उपद्‌व्यापांची गृहमंत्र्यांकडून दखल

– संजय कडू

पुणे – करोनावर उपचार करण्यासाठी चक्‍क रक्‍ताची विक्री करण्याचा धक्‍कादायक प्रकार डार्कनेटच्या माध्यमातून सुरू असल्याचा प्रकार उघड झाला. अद्याप त्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला नसला तरी सायबर गुन्हे विभागाकडून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्याबाबतचा गुन्हा अद्याप दाखल झालेला नसला तरी राज्याच्या गृहमंत्र्यांनीच त्याची गंभीर दखल घेतलेली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डार्कनेट गुन्हेगारी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइटच्या माध्यमांतून या रक्‍ताची जाहिरात केली जात आहे. मात्र, त्यासाठी ग्राहक मिळाले की नाही याची खातरजमा होऊ शकली नाही. अशा स्वरूपाचे सर्वच व्यवहार बेकायदा असल्याने त्याबाबत फसवणूक झाल्यासही गुन्हा दाखल करण्यास कोणीही धजावत नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन याचा तपास करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचे पोलीस दलातील विश्‍वासार्ह सूत्रांनी सांगितले.

“डार्कनेट’चा वापर सायबर गुन्हेगार करतात. ते डार्कनेटमध्ये जाऊन वेबसाइट बनवतात. हे सर्व व्यवहार फक्त बिट कॉईनच्या माध्यमातून होत असतात. प्लाझ्मा थेरपीमुळे करोनाबाधित बरे होत असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर अमेरिकेत प्लाझ्मासाठी रक्त विक्री झाली होती. त्याचे लोण आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फसवणुकीच्या व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. राज्यात प्लाझ्मा थेरपीसाठी राज्य सरकारची पूर्व परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणी आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

रक्तदात्यालाही आमिष अन्‌ फसवणूक
करोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर डार्क नेटवर कल्पनेच्या पलीकडे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. ज्याप्रकारे प्लाझ्मा थेरपीसाठी रक्त विकल्याच्या जाहिराती आहेत तशाच करोनातून बरे झालेल्यांना रक्त विकल्यावर चांगले दाम देण्याच्या जाहिरातीही झळकल्या आहेत. या जाहिरातील प्लाझ्मा विकून पैसे कमवू शकता असे म्हटले जात आहे. एखादा व्यक्ती संपर्कात आल्यास त्याचे बॅंक डिटेल्स घेतले जातात. यानंतर बॅंकेतून ऑनलाईन रक्कम काढून फसवणूक केली जाते. बेकायदा व्यवहारामुळे त्याची वाच्यता होत नाही, असे सायबर गुन्ह्यातील तज्ज्ञ ऍड. गौरव जाचक यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील माध्यमांशी रविवारी संवाद साधला, यावेळी करोनासंदर्भात डार्क नेटवरील क्राईम सिंडिकेटची त्यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र सायबर विभाग जनतेला या अशा सर्व गोष्टींपासून सावध राहण्याची सूचना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डार्कनेटवर करोनासंदर्भात प्लाझ्मा थेरपीसाठी रक्‍त विक्री आणि खोटी औषध विक्रीची एकही तक्रार अद्याप आली नाही. या प्रकारची तक्रार आल्यास त्यांची गांभीर्याने दखल घेऊन तपास केला जाईल
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्‍त, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.