बारामती : दि. 3 (प्रतिनिधी)-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या सुवर्णमहोत्सवी (50 व्या) वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कसबा, बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्स येथे पार पडलेल्या या उपक्रमात एकूण 115 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. हे रक्तदान शिबिर मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापूर यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. वैद्यकीय निकषांचे पालन करून सुरक्षित रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक जाणीव व क्रीडासंस्कृतीची एकत्रित अभिव्यक्ती घडल्याची भावना यावेळी मान्यवरांच्या द्वारे व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी , बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन सातव, दौंड पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, त्वचारोग तज्ञ डॉ. सुजित गवळी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विशाल मेहता, तसेच बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन 2020 पासून कार्यरत असलेले बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन हे बारामतीत क्रीडा संस्कृतीचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने सातत्याने कार्यरत आहे. बारामतीला भविष्यात ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खेळाडू घडविण्याचा ध्यास संस्थेने घेतला आहे. अजितदादांच्या निधनानंतर अपेक्षेप्रमाणे स्वच्छ व सुंदर बारामती घडविण्याच्या संकल्पातून फाउंडेशनतर्फे दर रविवारी शहरातील प्रमुख सार्वजनिक स्थळांवर सखोल स्वच्छता अभियान राबविले जाते. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, तिरंगा चौक, भिगवण चौक, स्मारक परिसर आदी ठिकाणी फाउंडेशनचे सदस्य सक्रिय सहभाग घेतात. फाउंडेशनच्या प्रमुख उपक्रम बारामती पॉवर मॅरेथॉन’चे यशस्वी आयोजन, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात आयोजित ‘पुणे ते बारामती 100 किमी ग्रुप रिले रन – आरोग्य वारी’, ‘गडकिल्ले सायकल राईड फॉर ग्लोरियस हिस्ट्री’ तसेच ऑलिम्पिक व आयर्नमॅन प्रशिक्षणाचा समावेश आहे. बारामती आणि परिसरातून आजवर 07 आयर्नमॅन घडविण्यात फाउंडेशनने यश मिळविले आहे.