उमाजीनगरमधील रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार

कोरेगाव – कोरेगाव तालुक्यात उमाजीनगर येथील सार्वजनिक रस्ता काही ठराविक लोकांनी विशिष्ट हेतूने बंद केला असून, विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी मोठे नुकसान होत आहे, त्याचबरोबर गाव संपर्कहीन झाले आहे. रस्ता बंद केल्याने भंडारमाची बोधेवाडी मार्गे परत गावात यावे लागत आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी एकमुखाने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना गुरुवारी दुपारी चार वाजता सादर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्यावतीने भंडारमाचीचे सरपंच समाधान मदने, सोमनाथ मदने, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, आनंदा जाधव, अविनाश मदने यांनी ३७ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन डॉ. संगमेश कोडे यांना सादर केले. प्रशासनाने याबाबत तातडीने हा रस्ता खुला न केल्यास एकमुखाने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.





