Bilinkit ने सुरू केली 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा

नवी दिल्ली – क्विक कॉमर्स क्षेत्राचा चेहरा मुलाग्रह बदललेल्या ब्लिंकीट कंपनीने आता दहा मिनिटाच्या आत अॅम्बुलन्स सेवा पुरवठा करण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही सेवा सध्या मर्यादित पातळीवर गुरुग्राममध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच या सेवेचा विस्तार देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
तसेच अॅम्बुलन्स सेवेचा उद्देश केवळ नफा कमविणे नसून ग्राहकांना शक्य तितक्या लवकर दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा पुढाकार घेण्यात आला असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबिंदर ढिंडसा यांनी सांगितले. सध्या ग्राहकांनी जे ब्लिंकीटचे अॅप डाऊनलोड केले आहे त्यावर गुरुग्राम येथील ग्राहकांना अॅम्बुलन्स सेवेचा पर्याय दिसून येईल. त्याचा वापर करून ग्राहक अॅम्बुलन्स बोलावू शकतील.
या अॅम्बुलन्समध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि कर्मचारी उपलब्ध असतील असेही स्पष्ट करण्यात आले. सध्या गुरुग्राम मध्ये केवळ पाच अॅम्बुलन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच अॅम्बुलन्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये शक्य तितक्या लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याला दोन वर्षे लागू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर किराणा माल आणि इतर वस्तू पुरवठा करण्याचे काम या कंपनीने देशभरात सुरू केले आहे. त्यामुळे इतर कंपन्यावरही अशा प्रकारच्या सेवा सुरू करण्यासाठी दबाव येत असून या कंपन्यांनी तशी तयारी केली असल्याचे दिसून येते.

