किल्ले शिवनेरीवर दृष्टिहिनांचा ‘जय शिवराय’चा जयघोष

जुन्नर (प्रतिनिधी) | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दुसऱ्या लॉक डाऊन नंतर किल्ले शिवनेरीचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने किल्ले शिवनेरीचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर पर्यटक व शिवभक्तांची पावले मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. परंतु किल्ले शिवनेरी वर सुरू असलेला पाऊस व परिसरात वाढलेली गच्च झाडी तसेच सततच्या पावसामुळे निसरडी झालेली वाट व जागोजागी साचलेली पाण्याची डबकी अशा प्रतिकूल वातावरण असूनही शिवभक्तांनाचा जोश कुठेही कमी दिसून येत नव्हता.
रविवारी (दि. ३) सकाळी गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जोरदार जयघोष करीत एक बस येते. त्यामधून हातात काठी आणि डोळ्यावर गॉगल घातलेल्या ३० व्यक्ती उतरतात. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला अतीव आदर आणि दृष्टिहीन असूनही गडावर जाण्यासाठी असलेली उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर व बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत होती. ह्या अंध व्यक्तींना किल्ले शिवनेरीची सफर घडवून आणण्याची जबाबदारी रोटरी क्लबच्या सदस्यांनी लीलया पार पाडली.
याप्रसंगी क्लबच्या सदस्यांनी या विशेष पाहुण्यांना वाट दाखविण्याचे अवघड काम जबाबदारीने पार पाडले. गडकिल्ले अभ्यासक विजय कोल्हे यांनी किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वास्तूंबद्दल माहिती दिली.
सदर उपक्रम रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व रोटरी क्लब लोकमान्यनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रविंद्र पाटील व हितेंद्र गांधी यांनी दिली.
याप्रसंगी महेश घोरपडे, अजय वाघ, तुषार लाहोरकर, प्रसाद माने, नारायणगाव क्लबचे अध्यक्ष मंगेश मेहेर, सचिन मलठणकर, ॲड. केतन पडवळ, ब्रिजेश बांदिल तसेच महिला दृष्टीहिनांसोबत सेजल गांधी, पल्लवी शाह, वंदना लाहोरकर, राधिका कोल्हे, ऋतुजा माळवदकर व श्रुष्टी भोसले आदींनी वाटाड्याचे काम केले. या उपक्रमाला शिवजन्म संवर्धन समितीचे अध्यक्ष रविंद्र काजळे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या विशेष पाहुण्यांसोबत गड सर केला.





