Satara | ‘ब्लाईंड गेम’ – रहस्यमय कथेचा गूढ प्रयोग

महाराष्ट्र शासन आयोजित 63 व्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेत सातारा केंद्रावर तिसऱ्या दिवशी शिवशक्ती सांस्कृतिक नाट्य कला मंडळ कुकुडवाड ता. माण या संस्थेने रत्नाकर मतकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले “ब्लाईंड गेम” हे नाटक सादर केले. एका मर्डर मिस्ट्री वरती आधारलेली संहिता आणि पूर्वी या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर झालेले अनेक प्रयोग असे नाटक, गूढ संहिता असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक विजय काटकर यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. कुकुडवाड सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शिवशक्ती सांस्कृतिक नाट्यमंडळ संस्थेने राज्यनाट्य स्पर्धेत हिरीरीने सातत्याने भाग घेऊन एक दमदार कलाकृती सादर केली याबद्दल त्यांचे कौतिकच करावं लागेल.
या नाटकामध्ये एक अंध असलेल्या महिलेच्या सभोवताली हा प्रयोग घडत जातो. सैन्यातून सेवानिवृत्त झालेला व आता फोटोग्राफी चा व्यवसाय करत असलेला अनिकेत आपली अंध असलेली पत्नी अनुराधा हिच्यासह राहत असतो, त्यांच्या घरात शेजारची छोटी मुलगी पिंकी हिचे सतत येणेजाणे चालू असते, पिंकी छोट्या छोट्या कामात या दांपंत्याला मदत करत असते. टोनी आणि श्रीकांत हे दोन भुरटे चोर असतात, त्यांची मैत्रीण रेश्मा ही ड्रग स्मगलर सईद च्या सांगण्यावरून ड्रग्ज च्या तस्करी मध्ये अडकते आणि तिचा खून होतो. सईद च्या सांगण्यावरून रेश्मा नैरोबीवरून एक ड्रगने भरलेली बाहुली घेऊन विमानतळावर उतरते, पण कस्टमच्या तपासणीतुन कसे वाचायचे यामध्ये विचार करत असताना प्रतिबंधित क्षेत्रात तिला अनिकेत मानकर फोटो काढत असलेला दिसतो. रेश्मा त्याच्याजवळ जाऊन त्याला विनंती करते कि तिची मुलगी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तिच्यापर्यंत या बाहुलीला पोहोचवा, अनिकेत यास तयार होतो. दुसऱ्या दिवशी अनिकेत हॉस्पिटल जाण्यास निघण्यापूर्वीच रेश्मा त्याच्या घरी पोहोचते, पण तेंव्हा बाहुली मिळून येत नाही, ही बाहुली मिळवण्याच्या नादात सईदकडून रेश्माचा खून होतो. पुढे त्या बाहुलीच्या शोधामध्ये सईद, टोनी आणि श्रीकांत हे तिघेजण अनुराधा आणि अनिकेत यांच्या घरी पोहचतात. श्रीकांत अनिकेतचा मित्र असल्याचे अनुराधाला सांगून घरात बाहुलीच्या शोध घेत राहतो. बाहुलीचा शोध घेत घेत संपूर्ण नाट्य घडतं जाते. अंध असलेली अनुराधा छोट्या पिंकीच्या मदतीने हे तिघेजण घरात का आले आहेत याचा छडा लावते आणि स्वतःचा बचाव करते असे कथानक असलेले रहस्यमय नाटक सादर झाले.
दिग्दर्शक विजय काटकर यांनी दिग्दर्शन सांभाळत श्रीकांत हे पात्रही छान वटवले. त्याचां स्टेजवरील वावर सफाईदार होता. अनुराधा हे पात्र साकारणाऱ्या सौ शुभदा कुलकर्णी यांनी आंधळे असलेल्या अनुराधाची भूमिका लीलया पेलली, असं म्हणतात कि अंध व्यक्तीचे इतर इंद्रिय खूप सवेंदनशील असतात हे त्याने खूप छान दाखवून दिले त्याचबरोबर जावेदखान मुलाणी याने सादर केलेला सईद हे पात्र रंगमंचावर एक दहशत निर्माण करून जातं होता. सुहास काटकर यानेही टोनी छान सादर केला. . हर्षा काटकर हिने 12 वर्षांची नटखट आणि तेवढीच खट्याळ मुलगी चांगल्या पद्धतीने सादर केली. श्रीकांत कुलकर्णी यांचा फोटोग्राफर अनिकेतही उत्तम वाटला. तांत्रिक बाजूची अपेक्षित साथ मिळाली असती तर प्रयोगाची उंची अजून वाढली असती, महादेव पुकळे आणि प्रकाश काटकर यांना प्रकाश योजनेचा छाप पाडण्यास अजून वाव होता. रहस्यमय नाट्यप्रयोगासाठी संगीतही तितकेच प्रभावी असणे आवश्यक असते यामध्ये संगीत संयोजन कमी पडले असे म्हणावे लागेल, सौ. उर्मिला काटकर आणि सतीश जाधव यांनी पार्श्वसंगीत सांभाळले. काटकर, सुतार, कुंभार यांचे नेपथ्य आवश्यक तेवढे व चांगले होते. वेशभूषा करताना थोडा रंगसंगतीवर विचार करायला हवा होता असे जाणवले.
एकूणच रहस्यमय कथा प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली. उत्तरोत्तर स्पर्धेस प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत असून प्रेक्षकांनी सांयकाळी ७ पूर्वी येऊन येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे संयोजकांनी कळवले आहे.
आज शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता आझाद हिंद प्रतिष्ठान निर्मित व बाळकृष्ण शिंदे लिखित ‘तीन फुल्या तीन फुल्या तीन बदाम’ हा नाट्य प्रयोग सादर होईल.





