शेअर बाजारात त्सुनामी येणार, 20% घसरणीचा अंदाज; जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओंचा गंभीर इशारा

Share Market | भारतासह जगभरातील शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील नव्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजार हादरला. अमेरिका सरकारने चीनवर 104% आयातशुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर, चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकन उत्पादनांवर 84% शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे.
यातच आता BlackRock या जगातील सर्वात मोठ्या वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ लॅरी फिंक यांनी बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बाजारात आणखी घसरण झाल्यास गुंतवणूकदारांना मोठा फटका बसू शकतो.
आधीच अमेरिकन शेअर बाजारातील Dow Jones Futures 1.7% नी घसरला आहे, तर S&P 500 मध्ये 1.5% घट झाली आहे. युरोपमधील इंडेक्सही 3 ते 4% नी घसरले आहेत. त्यातच लॉरी फिंक यांनी बाजारात आणखी 20 टक्के घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
जगातील सर्वात मोठ्या वेल्थ मॅनेजमेंट कंपनी BlackRock चे सीईओ लॅरी फिंक (Larry Fink) यांनी टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराविषयी अंदाज व्यक्त केला. त्यांच्या मते, जागतिक शेअर बाजारात आणखी 20% पर्यंत घसरण होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या घोषणेमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका अमेरिकन बाजारालाच बसू शकतो, असेही ते म्हणाले.
यावर्षी NASDAQ मध्ये आधीच 20% हून अधिक घसरण झाली आहे. जर लॅरी फिंक यांचा अंदाज खरा ठरला, तर भारतातील निफ्टी इंडेक्स 18,000 च्या खाली येऊ शकतो.
इतक्या मोठ्या घसरणीचा सामना करण्यासाठी भारतीय गुंतवणूकदार तयार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. मागील काही महिन्यांपासून स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये प्रचंड घसरून दिसून आली आहे. एसआयपीच्या गुंतवणुकीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे.
लॅरी फिंक म्हणाले की, त्यांनी अनेक सीईओं सोबत चर्चा केली असून, बहुतेकांचे मत आहे की अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. जर अमेरिका मंदीत आली, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारतालाही त्यातून वाचता येणार नाही.
सध्याच्या घसरणीकडे पूर्णपणे नकारात्मक दृष्टीने पाहू नये. ही वेळ घाबरून विक्री करण्याची नाही, तर चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे, असेही फिंक म्हणाले. या टॅरिफ वाढीमुळे वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असून, महागाईचा फटका सामान्य लोकांना बसू शकतो.





